अहमदनगर बातम्या

कुठे नेऊन ठेवलंय आपण नगर ? शहरात २० हजारांवर कुत्रे, मोकाट जनावरांचा हौदोस, जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची पर्यायाने नगर शहराची जुनी ओळख. नगरकरांनी नगरचे नाव, नावलैकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवले आहे. आज नगरकर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरात सापडेल.

या प्रत्येकालाच नगर शहराचा खूप अभिमान ! पण सध्या कुठे नेऊन ठेवलंय आपण नगर? असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे रस्ते, पाणी या समस्या नेहमीच्याच झाल्यात. रस्त्याची अवस्था किती दुर्दैवी आहे हे वेगळे सांगायला नको.

पण आता लोक या समस्यांपेक्षा जास्त वैतागले आहे ते मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या त्रासाला. अगदी हौदोस घातला आहे असं म्हणायला हरकत नाही. कुत्रे थेट वाहनचालकांचा पाठलाग करतायत, चिमुरड्यांवर हल्ले करतायेत,

तर जनावरे रस्त्यात ठांण मांडून बसल्याने रहदारी होतेय व अपघात होतायेत. त्यामुळे सध्या नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

* मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या

नगर शहरात सध्या २० हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्रे असल्याची माहिती आहे. या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या रात्री, दिवसा फिरत असतात. एकटा माणूस, लहान मुले व मोटारसायकलस्वार यांवर हल्ला करतात. याने अपघात देखील वाढले आहेत. मोकाट जनावरांचीही परिस्थिती भयानक आहे. ही जनावरे थेट रस्त्यातच ठाण मांडून बसतात.

* प्रशासन, शासनाची उदासिनता

प्रशासन , शासन स्तरावरून यासाठी काही हालचाली होताना दिसत नाहीयेत. कुत्रे पकडल्यानंतर त्यांना पिंपळगाव माळवी येथील केंद्रात नेऊन तेथे निर्बीजीकरण करून लसीकरण करणे व त्यांच्या कानावर व्ही कट मारणे असे काम करावे लागते.

परंतु सध्याची स्थिती पाहिली तर हे काम होतच नाही असे वाटते. त्याचप्रमाणे पाच महिन्यांपासून मोकाट जनावरे पकडणारी महापालिकेची यंत्रणा ठप्प असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र मोकाट जनावरे विनादिक्कत फिरत आहेत.

जनावरे पकडण्यासंबंधी तरतूद करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे मनपाचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या आंधळं दळत अन कुत्रा पीठ खात अशी स्थिती झाली आहे.

* संस्थेचे काम फास्ट होणे गरजेचे

शहरातील मोकाट कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्याचे काम पीपल्स फॉर अॅनिमल या संस्थेकडे होते. परंतु त्यांचा कार्यकाल संपल्याने काही काम ठप्प होते. आता याच संस्थेला तीन महिन्यांसाठी कुत्र्यांचा ठेका दिला आहे.

एका कुत्र्यासाठी मनपा या संस्थेला ९५० रुपये अदा करते. परंतु अडिच महिन्यात या कंपनीने अद्याप ५१४ कुत्रे पकडून त्यांचे निर्बीजीकरण केल्याचे समजते. त्यामुळे या संस्थेचे काम फास्ट होणे गरजेचे आहे. जेणे करून ही समस्या मिटण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office