अहमदनगर बातम्या

20 हजाराची लाच घेताना भूमी अभिलेखचे दोघे जाळ्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2022 Ahmednagar Crime :-20 हजार रूपयांची लाच स्वीकारताना कर्जत भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर पथकाने रंगेहाथ पकडले.

मुख्यालय सहायक सुनील झिप्रू नागरे (वय 48 हल्ली रा. भैलुमे चाळ, कर्जत) व भूकरमापक कमलाकर वसंत पवार (वय 52 रा. शाहूनगर, केडगाव, अहमदनगर) अशी पकडलेल्या कर्मचार्‍यांची नावे आहेत.

त्यांच्याविरूध्द कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबी जळगाव (ता. कर्जत) येथील तक्रारदार यांनी त्यांची पत्नी व इतर दोघांची माहिजळगाव (ता. कर्जत) शिवारात असलेल्या जमिनीची भुमी अभिलेख कार्यालय, कर्जत यांच्याकडून मोजणी करून घेतली होती.

मोजणीनुसार तिन्ही खातेदार यांचे पोट हिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविने करिता मुख्यालय सहायक नागरे व भूकरमापक पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाच्या अहमदनगर कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने बुधवारी केलेल्या लाच मागणी पडताळणीमध्ये नागरे व पवार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले.

त्यावरून गुरूवारी भूमी अभिलेख कार्यालय कर्जत येथे आयोजित केलेल्या लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान नागरे याने पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रूपये लाचेची रक्कम स्विकारली असता नागरे व पवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार रमेश चौधरी, वैभव पांढरे, रवींद्र निमसे, हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office