Ahilya Nagar News:- आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये राज्यात महायुतीने स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र असून काही जागांचे निकाल अजून यायचे बाकी आहेत. परंतु या वेळची विधानसभा निवडणूक ही खूपच महत्त्वाची आणि कायम आठवणीत राहील अशी ठरली आहे.
या निवडणुकीमध्ये महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव तर केलाच. परंतु राज्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज नेत्यांना यात पराभवाचा सामना करावा लागला व यामध्ये आपल्याला संगमनेर विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला समजला जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला.
परंतु यामध्ये जर आपण संगमनेर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बघितली तर ही खूप वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव हा शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ या नवख्या तरुणाने केला. त्यामुळे महाराष्ट्राला नक्कीच प्रश्न पडला असेल की नेमका अमोल खताळ आहेत तरी कोण? त्याबद्दलचीच माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत.
बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ आहेत तरी कोण?
आपल्याला माहित आहे की, यावेळेस संगमनेर विधानसभा निवडणूक ही विखे पिता पुत्रांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या ठिकाणाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना तगडी टक्कर देऊ शकेल असा कुठलाही नेता या ठिकाणी मिळत नव्हता. परंतु शिंदे गटाने अमोल खताळ यांना तिकीट दिले आणि याच अमोल खताळ यांनी आज बाळासाहेब थोरात यांना पराभूत केले आहे.
अमोल खताळ यांच्या मागे प्रामुख्याने विखे पिता पुत्राची ताकद भक्कमपणे उभे असल्याचे दिसून आले.या निवडणूक प्रचारादरम्यान अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत व त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे असे प्रतिपादन करून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा निवडणुकीमध्ये रंगत आणली होती.
अमोल खताळ यांच्याबाबत जर आपण बघितले तर सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीकरिता प्रसंगी प्रशासनाला देखील अंगावर घेणारा नेता म्हणून त्यांची प्रामुख्याने ओळख आहे. जेव्हा शिंदे गटाने त्यांना तिकीट दिले त्या अगोदर ते भाजपचे मतदार संघ प्रमुख होते. जरी चार दशकांपासून संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता.
तरीदेखील गेल्या चार ते पाच वर्षापासून या ठिकाणी भाजप व त्या माध्यमातून अमोल खताळ यांनी सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले होते व त्यामुळे त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली होती.
आजपर्यंत जर आपण बघितले तर त्या ठिकाणहून मातब्बर उमेदवार संगमनेर मध्ये थोरात यांच्या विरोधात नसल्याने त्यांचा एकतर्फी विजय त्या ठिकाणी होत होता. परंतु अमोल खताळ यांनी या निवडणुकीत थोरात यांना तगडी टक्कर दिली व विजयश्री खेचून आणली.
बाळासाहेब थोरात यांच्या विषयी होती मतदारसंघांमध्ये नाराजी?
विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री होते. परंतु तालुक्यातील जिरायती पट्ट्यातील तरुणांसाठी त्यांनी औद्योगिक वसाहत तयार केली नाही असा आरोप अमोल खताळ यांच्याकडून केला गेला होता. या निवडणुकीत प्रचारादरम्यान संगमनेर मधील युवकांच्या रोजगाराकरिता औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन अमोल खताळ भाषणांमधून देत होते.
त्यामुळे संगमनेर मधील तरुण वर्ग त्यांच्याकडे आकर्षित झाल्याचे आपल्याला या निवडणुकीत दिसून आले. तसेच बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना देखील महायुतीने दोन वर्षांमध्ये सहाशे कोटींचा निधी या ठिकाणी दिला होता व अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले होते.
लाडकी बहीण योजनेला देखील या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याने याचा देखील फायदा अमोल खताळ यांना झाला. तसेच थोरात यांनी गौण खनिज माफीया या तालुक्यात तयार केल्याचा आरोप देखील चांगला चर्चेत होता. या प्रकारचे अनेक मुद्दे खताळ यांच्या प्रचारात सकारात्मक वातावरण तयार करत गेले व त्यांना आज विजय मिळाला.
तसेच अमोल खताळ हे भाजपचेच कार्यकर्ते असल्यामुळे विखेंसोबत देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे थोरातांच्या विरोधात विखेंची प्रवरा यंत्रणा अमोल खताळ यांच्याकरिता काम करत होती व अजित पवार गट तसेच शिंदे गट आणि भाजपने प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून नियोजनबद्ध प्रचार केल्यानेच बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या दिग्गजाचा पराभव अमोल खताळ यांना करणे शक्य झाले.