अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे.
७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्य पदांसाठी १३ हजार १९४ उमेदवारांचे भविष्य मतदानाद्वारे ईव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे.
आज सोमवार रोजी १४ तालुक्यात निर्धारीत ठिकाणी तहसीलदारांच्या निगराणीत मतमोजणी होणार असून ‘ कोणावर गुलाल ‘ याचा निकाल लागणार आहे.
मतमोजणीसाठी कडेकोट नियोजन करण्यात आले असून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगामी पाच वर्षासाठी गावचे कारभारी कोण ? याची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.
दरम्यान, दि. १५ जानेवारी रोजी जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या ५ हजार ७८८ सदस्य पदांसाठी २ हजार ५५३ मतदान केंद्रावर सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली.
यासाठी एकूण १२ हजार ७६५ अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. मतदानाच्या अंतिम मुदतीपर्यंत एकूण ११ लाख ६७ हजार २५६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
यात ५ लाख ४८ हजार ६३४ महिला आणि ६ लाख १८ हजार ६२० पुरुष आणि इतर दोन आशा मतदारांचा समावेश होता. चुरशीच्या निवडणूकीमुळे जिल्ह्यात एकूण ८२.७३ टक्के मतदान झाले.
आज तालुकास्तरावर संबंधित तहसीलदार यांच्या निगराणीत मतमोजणी होणार आहे. यासाठी यथास्थित नियोजन व बंदोबस्त करण्यात आल्याची माहिती महसूल शाखेच्या उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी दिली.