अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :-समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाची निर्णायक घोषणा केली होती. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी अण्णांना उपोषण करू नये, यासाठी मनधरणी करण्यास सुरूवात केली होती. परंतु ती आता सफल झाली आहे.
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्तीनंतर अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अण्णा नक्की कोणाच्या बाजूने आहेत.
असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून होत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.
केंद्र सरकारला आपण शेतकऱ्यांशी संबंधित १५ मुद्दे दिले आहेत. त्यावर केंद्र सरकार नेमणार असलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये योग्य ते निर्णय होतील, असा आपल्याला विश्वास वाटतो म्हणून आपण आपले उपोषण स्थगित करीत आहोत, असे अण्णांनी सांगितले. अण्णांनी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढायचे आणि नंतर ते म्यान करायचे असे यापूर्वीही घडले आहे.
त्यामुळे आताही ते घडले तर त्यात अनपेक्षित असे काही नाही, अशी शंका शिवसेनेनं बोलून दाखवली आहे. सरकार आता त्यांचे आंदोलन चिरडायला निघाले आहे. गाझीपूर बॉर्डरवर सरकारने शेतकऱ्यांची कोंडी केली आहे.
वीज, पाणी, अन्नधान्याची रसद कापली आहे. शेतकरी हे जणू आंतरराष्ट्रीय भगोडे आहेत, अंमली पदार्थांचे आर्थिक गुन्हेगार आहेत असे ठरवून त्यांना ‘लुकआऊट’ नोटीस बजाविण्यात आली आहे.
हे धक्कादायक आहे. अण्णा हजारे यांचे या घडामोडींवर नेमके काय मत आहे? मुळात अण्णा हजारे जे उपोषण करू इच्छित होते, त्यामागचा नेमका हेतू काय आहे? कृषी कायदे रद्द करावेत असे आंदोलक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.