माझ्या घरासमोर मुरूम का टाकला; सरपंचावर केला कोयत्याने हल्ला, नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला धक्कादायक प्रकार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmed nagar News : माझ्या घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत एकाने सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी घडली.

या बाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अय्याज शौकत शेख याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अक्ट सह अट्रॉसीटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान ज्यावेळी हा प्रकार घडला त्याचा विडिओ काढण्यात आला असून हा विडिओ व्हायरल झाला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी, सध्या पावसाळा सुरु असल्याने गावात रस्त्यात चिखल होवू नये म्हणून ग्रामपंचायतच्यावतीने गावातील रस्त्याचे मुरुमीकरण सुरु सुरु आहे. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास सरपंच किरण साळवे, उपसरपंच विठ्ठल हंडोरे व ग्रामपंचायत सदस्य आणि इतर काही जण हे काम कसे चालले आहे याची पाहणी करत होते. त्यावेळी आरोपी अय्याज शेख तेथे मोटारसायकलवर आला.

त्याने सरपंच साळवे यांना जातीवाचक शिवीगाळ करत, तुला सांगितले ना माझ्या घरासमोर मुरूम टाकू नको, तु जातीच्या जीवावर लय माजला काय, थांब तुझा माज जिरवतो, असे म्हणत पळत घरात गेला व घरातून धारदार कोयता आणून सरपंच साळवे यांच्यावर वार केला.

मात्र त्यावेळी सरपंच साळवे मागे सरकल्याने ते थोडक्यात बचावले. त्यानंतर त्याने पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या आईने त्याच्या अंगावर उडी मारली व त्याचा वार हुकवला. त्यानंतर त्याने सरपंच साळवे तसेच उपसरपंच विठ्ठल हंडोरे यांनाही अश्लील भाषेत शिवीगाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेबाबत सरपंच साळवे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात जावून फिर्याद दिली. स.पो.नि. प्रल्हाद गीते यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. तसेच घटनेच्या वेळीचे छायाचित्रीकरण पाठवले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office