अहमदनगर बातम्या

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानातील तालुकास्तरीय विजेत्या शाळांची बक्षिसे का दिली नाहीत ? : तनपुरे

Published by
Ahmednagarlive24 Office

शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबर भौतिक सुविधा निर्माण होऊन शाळांमध्ये त्या अनुषंगाने निकोप स्पर्धा निर्माण व्हावी, या उद्देशाने राज्य सरकारने राबवलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानातील तालुकास्तरीय विजेत्या शाळांची घोषणा होऊन चार पाच महिने झाले, तरी अजूनही त्याची बक्षीसे का देण्यात आली नाही? असा प्रश्न डॉ बाबुराव बापूजी तनपुरे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केला आहे.

याबाबत अहिर केलेल्या पत्रकात तनपुरे यांनी म्हटले, की अभियानाचा दुसरा टप्पा आता सुरू झाल्याने आधीच्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे गुणानुक्रम व बक्षीस वितरण याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

२०२३- २४ या शैक्षणिक वर्षामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत राबवण्यात आले. त्या स्पर्धेतील यशस्वी शाळांची नावे तालुका व जिल्हास्तरावरील नावे जाहीर झाली.

त्यात पहिले बक्षीस कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयास व दुसरे व तिसरे बक्षीस आमच्या संस्थेच्या दोन शाळेस मिळाले आहे. बक्षीसे जाहीर होऊन चार पाच महिने होऊनसुद्धा बक्षीस वितरण करण्यात आले नाही.

बक्षीसे कधी मिळणार, याबाबत शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांना खूप उत्सुकता लागली आहे. बक्षीसांचे वाटप या महिन्यात झाले तर ठिक अन्यथा ही बक्षीसे आचारसंहितेत अडकून ती थेट पुढच्या वर्षीच मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे ही स्पर्धा मुख्यमंत्र्यांच्या नावाने असतानासुद्धा बक्षीसे देण्यास उशीर झाल्याने त्यामुळे या अभियानात सहभाग घेऊन मनस्ताप करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे.

तालुकास्तरावर प्रथम आलेल्या शाळेस तीन लाख, द्वितीय शाळेस दोन लाख, तर तृतीय क्रमांकाच्या शाळेस एक लाखाचे पारितोषिक देवून गौरवण्यात येणार आहे. याबाबत शासनाने निधीची तरतूद देखील केलेली आहे.

Ahmednagarlive24 Office