अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2022 :- किराणा दुकानातून वाईन विक्रीच्या निर्णयावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान अण्णांची मनधरणी सुरु आहे.
यामुळे आंदोलन करायचं की नाही याचा निर्णय आज रविवारी रोजी घेणार असल्याचे हजारे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान राज्य सरकारच्या
या निर्णयाचा विरोधात अण्णांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग यांनी राळेगण येथे धाव घेत त्यांनी अण्णांशी चर्चा केली.
या चर्चेनंतर आपलं 50 टक्के समाधान झाले, असे अण्णा हजारे यांनी सांगितले. उपोषणासंबंधी रविवारी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान सिंग यांनी हजारे यांच्याशी चर्चा करताना उपोषण टाळण्याची विनंती केली आहे. नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरिक्षक बी.जी.शेखर पाटील या चर्चेवेळी उपस्थित होते.
किराणा दुकानात वाईन विक्री करण्यापूवी त्यावर जनतेकडून हरकती, त्यांचे अभिप्राय मागवण्यात येणार आहेत. तसेच ग्रामसभेच्या परवागनीनंतरच हा निर्णय अंतिम करण्यात येणार आहे.
वाईन विक्रीचा निर्णय वेगवेगळ्या टप्प्यावर पडताळून पाहिल्यावर अंतिम होणार असल्याने हजारे यांनी उपोषणाची घाई करू नयेत, अशी विनंती केल्यानंतर अण्णांनी यावर प्रतिक्रीया दिली आहे.