अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी येथील स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.८) सकाळी ११.३० वाजता प्रांताधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार असल्याची माहिती स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सोनाई येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून नवीन श्रीरामपूर जिल्हा हा घोषित केला होता. परंत संगमनेरकरांनी मध्येच उडी घेतल्याने हा जिल्ह्याचा विषय गेली ४० वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे.
राज्य शासनाने नुकतेच शिर्डी येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करून त्या इमारतीसाठी भरीव तरतूद देखील केली आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी असोसिएशन तसेच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून श्रीरामपूर जिल्ह्याचा निर्मितीचा लढा तीव्र उभारला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही.
येत्या तीन महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तेव्हा जो पक्ष. नेता श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रयत्न करेल त्याच्यामागे श्रीरामपूरची जनता खंबीरपणे उभी राहील. परंतु जर स्वतःच्या स्वार्थासाठी, राजकारणासाठी कोणी नेता बचावाचे धोरण स्वीकारून राजकारण करत असेल, तर त्याला श्रीरामपूरची जनता माफ करणार नाही.
त्यामुळे येत्या ८ जुलै रोजी श्रीरामपूर जिल्हा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर भव्य
निदर्शने करणार आहे.
त्यामुळे या निदर्शनात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई, मनसे पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकत्यांनी तसेच व्यापारी यांनी राजकारण बाजूला ठेवून श्रीरामपूरकर म्हणून जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे, उपाध्यक्ष संदीप मगर, सचिव राजेंद्र सोनवणे यांनी आवाहान केले आहे.
आंदोलन यशस्वीतेसाठी अरुण नाईक, लकी सेठी, अशोक उपाध्ये, सचिन बडदे, नागेश सावंत, तिलक डुगरवाल, मनोज आगे, संजय छल्लारे, मुक्तार शहा, आदित्य आदिक, प्रवीण फरगडे, राहुल मुथा, प्रेमचंद कुंकूलोळ, अभिजीत लिप्टे, भैय्या भिसे, मिलिंदकुमार साळवे, विजय नगरकर, बाळासाहेब बागुल, हनीफ पठाण, रियाज पठाण, तेजस गायकवाड, शुभम वाघ, उमेश पवार, अहमद जाहागीरदार, सुरेश दुबे, दीपक कदम आदी कार्यकर्ते प्रयत्नशील आहे.