Ahilyanagar News:- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झालेत व या निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून आणि काही सामाजिक कार्यकर्ते व संघटनांकडून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले असून ईव्हीएमच्या बाबतीत देखील या निमित्ताने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या प्रकाराला जन आंदोलनाचे स्वरूप दिले जाण्याची शक्यता असून ईव्हीएमच्या विरोधात सगळे विरोधी पक्ष एकवटतील अशी एक शक्यता दिसून येत आहे.
अगदी याच पद्धतीचे जर आपण स्थिती बघितली तर ते अहिल्यानगर जिल्ह्यात दिसून येत असून या ठिकाणी पाथर्डी येथे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह मतदारांचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता.
या आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये ईव्हीएम मशीन संदर्भात जन आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून महाविकास आघाडीचे सर्व पराभूत उमेदवार आता शॅडो एमएलए म्हणून येणाऱ्या कालावधीत काम करणार असून जनतेला बरोबर घेऊन विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी रविवारी म्हणजेच आज अकरा वाजता पाथर्डी येथील वीर सावरकर मैदानावर मेळाव्याचे आयोजन केले असून यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात येणाऱ्या काळात मोर्चे बांधणी अहिल्यानगर जिल्ह्यातून होण्याचे संकेत आता मिळत आहेत.
या मेळाव्याला उपस्थित राहणार महाविकास आघाडीचे हे नेते
आज आयोजित करण्यात येत असलेल्या मेळाव्याला आमदार रोहित पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून अकोले विधानसभा मतदारसंघातील अमित भांगरे, कोपरगावचे संदीप वर्पे, राहुरीतील प्राजक्त तनपुरे, पारनेर मधील राणी लंके आणि अहिल्यानगर शहरातील अभिषेक कळमकर यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.
या या परिस्थितीवर बोलताना एडवोकेट प्रताप ढाकणे यांनी म्हटले की, मतदारांनी भरभरून मते देऊन आमच्यावर विश्वास टाकलेला होता. परंतु लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या निवडणूक कार्यपद्धतीमुळे आम्ही विधानसभेच्या सभागृहात पोहोचू शकलो नाहीत. परंतु जनतेने मत देऊन आमची जबाबदारी वाढवली आहे.
त्यामुळे येणाऱ्या कालावधीत शॅडो एमएलए अशी कार्यपद्धती अवलंबली जाणारा असून जनतेला बरोबर घेऊन फसवणूक करून निरकुंश सत्ता मिळवणाऱ्यांना जाब विचारला जाईल. यामध्ये सर्वजण समविचारी कार्यकर्ते जनतेला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत असे देखील त्यांनी म्हटले.
इतकेच नाही तर हा मेळावा झाल्यानंतर मुंबई येथे आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रोहित पवार मुंबईच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाथर्डी येथून मुंबईला जाणार असल्याचे देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या या सगळ्या प्रयत्नांना लोकांकडून कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो? हे आपल्याला येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे.