अहमदनगर बातम्या

आगामी विधानसभेला महाविकास आघाडीचे सरकार असेल का? आ. थोरात यांचे मोठे वक्तव्य

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांसह येथील चांगल्या वातावरणामुळे तालुक्याचा लौकिक निर्माण झाला आहे.दुष्काळी भागाला नवसंजीवनी देणारे निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले.

सततच्या विकासकामांतून येणाऱ्या विधानसभेतही मोठे यश मिळणार आहे.आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असेल, असे मोठे वक्तव्य काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

तसेच केंद्रातील भाजप सरकारची घमेंड महाराष्ट्राने उतरवली अशी टीका करत राज्य सरकारच्या निवडणुकीपुरत्या असणाऱ्या फसव्या घोषणांना फसू नका, असे आवाहन देखील आमदार थोरात यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी आमदार थोरात म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने स्वायत्त असलेल्या ईडी, सीबीआय सारख्या संस्था गुलाम बनवल्या. त्यातून दबावाचे राजकारण सुरू केले. देशात महागाई, बेरोजगारी वाढली असून शेतकरी, कामगार, सर्वसामान्य माणूस अडचणीत आहे. मात्र सरकारचे त्याकडे लक्ष नाही. जातीभेद आणि घमेंड असणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारला रोखण्याचे काम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने आणि जनतेने केले आहे.

राज्यात आलेले सरकार जनतेला मान्य नाही. त्यांच्यामध्ये ताळमेळ नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळणार असून संगमनेरमधूनही मोठे यश मिळणार आहे. सतत काम करत राहणे हे आपले वैशिष्ट्य आहे.

राज्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपल्याला मान मिळतो, हे जनतेचे प्रेम आहे. आगामी काळामध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे रहावे. असे आवाहन त्यांनी केले.

१९८५ सालापासून तालुक्यातील जनतेने खूप प्रेम केले. यामुळे राज्यात मिळालेल्या मोठ्या संधीचा सर्वसामान्यांच्या विकासासाठी उपयोग केला. निळवंडे धरण कालव्यांसह अनेक कामे मार्गी लावली, असे आ. थोरात म्हणाले.

आमदार सत्यजित तांबे म्हणाले, संगमनेर तालुक्यात विकासाची गंगा आली आहे. कायम सर्वांना सोबत घेऊन काम केल्याने तालुक्याचे होते. कुटुंबप्रमुख म्हणून सर्वजण आ. थोरात यांचा आदर करतो. मनाचा मोठेपणा असलेले आ. थोरात मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील सर्वात पुढचे नाव आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office