अहमदनगर बातम्या

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्याना दिवाळीपूर्वी मदत देण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री हसन मुश्रीफ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थिमुळे ज्या गावात शेतीचे व घराचे नुकसान झाले आहेत अशा गावातील बाधिताना दिवाळीपर्यंत मदत देण्यासाठी प्रयत्न करणार, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नुकसानिबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे व पुरामुळे बाधित झालेल्या भागाचे बाकी असलेले पंचनामे तात्काळ पूर्ण करून घ्यावेत. राज्य शासनातर्फे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचे काम अंतिम टप्प्यात असुन दिवाळीपर्यंत थेट त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल.

तसेच शासन निर्णयानुसार अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्याच्यावर नुकसान झालेल्या पिकांखाली क्षेत्रासाठी द्यावायचा दर निश्चित झाला असुन जिराईत क्षेत्र १० हजार रुपये हेक्टर, बागाईत क्षेत्रासाठी १५ हजार रुपये हेक्टर, फळबाग क्षेत्र २५ हजार रुपये हेक्टर याप्रमाणे मदत जाहीर झाली आहे.

अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाई म्हणुन ३७ हजार ५०० प्रति हेक्टर याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. ३७४ हेक्टर जमीन अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेली आहे. या क्षेत्रासाठी हा लाभ देण्यात येणार आहे. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडला काही भागात कमी दिवसात जास्त पाऊस झाला त्यामुळे शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत असुन दररोज १५ हजार लोकांच्या कोविड चाचण्या होत आहे. जिल्ह्यात ६७ टक्के लोकांनी पहिला डोस घेतलेला असुन दूसरा डोस २३ टक्के लोकांनी घेतलेला आहे.

त्यामुळे ज्यांचा दुसरा डोस राहिलेला आहे त्यांनी तो घेऊन प्रशासनास सहकार्य करावे. एकूणच लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रशासनातर्फे मेळावे घेणे गरजेचे असुन प्रत्येक गावागावात लसीकरण झाले पाहिजे.

अजुन कोरोनाचा धोका कमी झालेला नाही यासाठी लोकांनी खबरदारी घ्यावी. तिसरी लाट येऊ नये म्हणुन प्रशासनातर्फे पूर्णपणे खबरदारी घेण्यात येत आहे.

जनतेने सुद्धा स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घेऊन मुख पट्टी वापर करणे, सानिटीझरचा वापर करणे, हाथ धुणे व सामाजिक अंतर पाळणे या गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजे. लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी तसेच आरोग्य विभागाने जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण होईल यासाठी मोहीम राबवावी.

अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office