अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-कोरोना माहामारीत सर्वसामान्य गोरगरीब लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी साईबाबा संस्थान ॲक्शन मोडमध्ये असून ऑक्सिजन प्लँटच्या निर्मितीबरोबरच कोरोना लॅब आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था आठ दिवसांत करण्याच्या दृष्टाने साईसंस्थान प्रशासन कामाला लागले आहे.
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला असुन रूग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नसल्याने मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे सध्या मसूरी येथे प्रशिक्षणासाठी गेले असल्याने संस्थानचा कारभार रवींद्र ठाकरे यांच्याकडे आहे.
ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेडीकल संचालक डॉ. प्रितम वडगावे यांची संपुर्ण वैद्यकीय टीम अहोरात्र कोरोना रूग्णांच्या सेवेत कार्यरत आहे.
जिल्हा प्रशासनाने साईसंस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालयात अत्यवस्थ कोविड रुग्णांसाठी काही वार्ड आरक्षित केले आहेत.
तसेच साईआश्रममध्ये अत्याधुनिक कोविड सेंटरची निर्मिती करून तेथे डॉक्टरांसह सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने कोविड रूग्णांना साईसंस्थानच्या आरोग्य सेवेचा मोठा लाभ होत आहे.सध्या ऑक्सिजन,
रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असल्याने प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांची डोकेदुखी वाढली असल्याने मसुरी येथे प्रशिक्षणासाठी असलेल्या बगाटे यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शिर्डी येथील
साईसंस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालयात भव्य ऑक्सिजन प्लँटची येत्या आठ दिवसांत उभारणी करण्याचा प्रयत्न सुरू केला असुन साईसंस्थानच्या रूग्णालयातच कोरोना चाचणीची लँबचीही निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होण्याच्या दृष्टाने आपण वरिष्ठ पातळीवर संपर्कात असुन येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लँट, कोरोना टेस्टिंग लॅबची उभारणी करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असल्याचे साईबाबा संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी सांगितले.