अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-बिबट्याने हल्ला करीत ओढून नेत असलेल्या बकरीला युवकाने धाडस दाखवून वाचवल्याची घटना कोल्हार-राजुरी रस्त्यावरील राऊत वस्तीवर घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, कोल्हार राजुरी रस्त्यावर अनिकेत संजय राऊत हा युवक शनिवारी आपल्या घरानजीक असलेल्या शेळ्या चारीत असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत एक बकर ओढून नेत असल्याचे पाहिले.
यावेळी त्याने हातातील मोबाईल बिबट्याला मारुन फेकला. परंतु बिबट्याने बकराची मान सोडली नाही. बिबट्या बकराला घेऊन उसाच्या शेतात निघाला. अनिकेतने धाडस करून या बिबट्याचा उसाच्या शेतात जावून पाठलाग केला.
बिबट्याच्या तावडीतून बकराला सोडवले. या बकराला तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून घेऊन त्याच्यावर उपचार केले. एक महिन्यापुर्वी याच वस्तीवर सतिश राऊत व प्रकाश राऊत यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला चढवला होता.
एक ते दिड महिन्यापासून बिबट्याची मादी व तिची दोन बछड्यांचा या परिसरात वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. यामुळे याठिकाणी पिंजरा बसविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.