अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- ब्राम्हणी परिसरात सलग दुसर्या दिवशी दरोडा पडला आहे. ब्राम्हणी येथे सोनई – राहुरी रस्त्यालगत राहणारे संतोष चावरे व डॉ. सुभाष चावरे या बंधूंच्या घरी शनिवारी पहाटे दरोडा पडला.
सुमारे अडीच ते तीन तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुरुवातीला चोरटे खळवाडी परिसरातील एक-दोन घरी गेले. एका ठिकाणी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, अपयश आले. त्यानंतर भाऊसाहेब खोसे यांच्या वस्तीवर गेले.
कोणीतरी जागे असल्याचा अंदाज घेतला.त्याठिकाणी चोरी करणे अशक्य वाटल्याने त्यांनी आपला मोर्चा उसाच्या पिकातून चावरे यांच्या घराकडे वळविला. चोरट्यांनी मागील बाजूचे गेट तोडून प्रवेश केला.
प्रत्येकाच्या हाती चाकूसारखे हत्यार होते. चावरे यांच्या घरात घुसून संतोष चावरे यांच्या मुलाच्या गळ्याला चाकू लावला. त्या भीतीपोटी पूर्ण कुटुंब धास्तावले.
मुलाच्या आईकडून कपाटाच्या चाव्या ताब्यात घेतल्या. उचकापाचक करून काही पैसे व दागिने चोरले. त्यानंतर चोरट्यांनी घराच्या मागील बाजूने शेतातून पळ काढला. घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.