Ahmednagar News : नगर ते शेवगाव बस प्रवासादरम्यान महिलेच्या चार लाख चार हजार रूपये किंमतीच्या ६३ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी झाली. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्मिता कल्याण पागर (रा. रेणुकानगर, केडगाव, मुळ रा. आंतरे ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी स्मिता या नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता माळीवाडा बसस्थानकात आल्या होत्या. त्यांच्यासमवेत इतर नातेवाईकही होते. त्या शेवगावला जाणाऱ्या बसमध्ये बसल्या.
शेवगाव येथे सकाळी ११ वाजता गाडगेबाबा चौक, आखेगाव रस्ता येथे उतरल्या. त्या माहेरी गेल्यावर त्यांनी लग्नसमारंभात दागिने घालण्यासाठी पर्स उचकली असता त्यामध्ये दागिने नव्हते. तीन लाख ८० हजार रूपये किंमतीचे ५६ ग्रॅमचे सहा पदरी टेम्पल डिझाईनचे गंठण आणि २४ हजार रूपये किंमतीचे सात ग्रॅमचे कानातील टॉप्स असे चार लाख चार हजार रूपये किंमतीचे दागिने चोरीला गेले होते.
त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी शेवगाव पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.