अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव येथे महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला. या प्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५, रा. पांढरे वस्ती, शिरसगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शिरसगाव येथे एकटी राहात होती. तिचा मुलगा नोकरीस असून मुलीचे लग्न झाले आहे. महिला ८ जानेवारीपासून बेपत्ता होती. याबाबतची माहिती मिळताच तिचा मुलगा दिनेश भोजणे हा शहापूर येथून शिरसगावला आला होता.
त्याने तालुका पोलीस ठाण्यात आपली आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलगा व शेजारी राहाणाऱ्या काही जणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या मिळून आल्या नाही. घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत पाहिले असता घरामध्ये सुकलेल्या रक्ताचे डाग आढळून आले. यानंतर मुलाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
चंद्रभान चांगदेव चौधरी (रा. शिरसगाव) व सुभाष नाना सुर्यवंशी (रा. लिंगदेव) यांचे आपल्या घरी येणे-जाणे होते. अज्ञात कारणावरुन या दोघांनीच आईचे अपहरण करून तिचा खून केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. यानंतर पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरसगाव येथील घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
त्यांनाही रक्ताचे डाग आढळले. पोलीस पथकाने शिरसगाव येथील डोंगरदऱ्यांमध्ये पाहणी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पाचरुपी दरीमध्ये सुनंदा भोजणे यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.