अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-राज्यासह जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. दिग्गज पुढाऱ्यांसह कार्यकर्ते देखील निवडणुकीच्या कामात मग्न झाले आहे.
यातच निवडणूक म्हंटले कि सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक कामांमध्ये केली जाते. मात्र राहाता तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामातून महिला, दिव्यांग आणि बीएलओ असलेल्या शिक्षकांना सूट मिळावी.
यासाठी नुकतेच राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेने तहसीलदार कुंदन हिरे यांना निवेदन दिले आहे. राहाता तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कुंदन हिरे यांची समक्ष भेट घेतली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
महिला शिक्षिकांना दिली जाणारी केंद्राध्यक्ष म्हणून नियुक्ती रद्द करावी, मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामातून सूट द्यावी, महिला शिक्षिकांना फक्त मतदान अधिकारी क्रमांक तीन म्हणून नियुक्ती द्यावी,
महिला शिक्षिकांना स्वतःच्या राहत्या गावात किंवा गावाजवळ निवडणूक कर्तव्य द्यावे, दिव्यांग बांधवांना व बीएलओ म्हणून कार्यरत असणार्या तसेच आजारी,
दीर्घ रजेवरील प्राथमिक शिक्षकांना व स्तनदा माता शिक्षिकांना आलेले नियुक्ती आदेश रद्द करावेत, अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.