पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीला महिलांनी ठोकले टाळे

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्याच्या मागणीसाठी कोहंडी येथे लहान मुलांसह संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला काल गुरूवारी (दि.१६) टाळे ठोकले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई भांगरे यांना हे समजताच त्यांनी तत्काळ गावात येत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांच्या कानावर महिला, ग्रामस्थांच्या भावना टाकल्या.

ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणामुळे एक महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची वणवण असून नागरिकांना विहिरीतील खराब पाणी प्यावे लागत आहे. आदिवासी भागातील कोहंडी हे अत्यंत महत्त्वाचे गाव आहे. जवळच एक किलोमीटरवर निळवंडे धरणाचा बॅकवॉटर मात्र आजही पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते.

कोहंडी येथील ग्रामस्थांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. असे महिलांचे म्हणणे आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर देखील आदिवासी भागातील ही सत्य परिस्थिती पाहताना पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या संवेदना जातात कुठे हे समजत नाही? असा संतप्त सवाल महिला करत होत्या. आम्ही काय मागतो तर स्वच्छ पाणी ते देण्यास जर एक महिना लागत असेल तर नेमके काय समजायचे. आदिवासी भागातील लोक हे खूप स्वाभिमानी असून त्यांचा उद्रेक झाला तर पळता भुई थोडी होईल हे प्रशासन आणि पदाधिकारी यांनी समजून घ्यावे, असा इशारा येथील महिलांनी दिला.

कोहंडी येथील महिलांनी अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनीताताई भांगरे यांच्याशी संपर्क साधला. श्रीमती भांगरे या गावात पोहचल्या. महिलांच्या भावना लक्षात घेतल्या. कोणत्याही परिस्थितीत आत्ताच्या आत्ता महिलांना पाणी मिळाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा कोणत्याही प्रकारचा धाक दरारा अधिकारी वर्गात शिल्लक नसल्याने अधिकाऱ्यांची मनमानी चालू आहे. दूषित पाण्यात टीसीएल टाकायचे सुद्धा काम केले जात नाही. लहान मुलं आजारी पडून हजारो रूपये दवाखान्याचे बिल भरावे लागत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे. त्यांच्या भावना प्रचंड तीव्र होत्या.

ग्रामपंचायत ग्रामसेवक शिंदे यांना श्रीमती भांगरे यांनी फोनवर चांगलेच धारेवर धरले. आजच टँकरची व्यवस्था करतो, असे शिंदे यांनी सांगितले. आज दुपारपर्यंत पाणी नाही आले तर पुन्हा फोन करा. मी पुन्हा येते असे म्हणत श्रीमती भांगरे यांनी महिलांना आधार दिला. आदिवासी भागातील परिस्थिती बिकट असून शेतीचे पाणी सोडा, पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. त्यामुळे विकासाच्या गप्पा मारणाऱ्यानी जरा या माझ्या मायमाऊल्यांचा प्रश्न समजून घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, जमत नसेल तर आपल्या खुर्चा खाली कराव्या, असा टोला सुनीताताई भांगरे यांनी लोकप्रतिनिधी यांना लगावला आहे.

आम्हाला आमच्या हक्काचे पाणी द्या, आमचे पाणी जायकवाडी पर्यंत जाते. शेतीला, उद्योग व्यवसायांना पाणी जाते, मात्र आम्हाला प्यायला पाणी नाही. उद्या खराब पाण्यामुळे कुणी आजारी पडले, जीवनीशी गेले तरी याला जबाबदार कोण? असा सवाल येथील महिलांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe