अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील महिलांना मिळणार मोफत साडी ! पहा तुमच्या तालुक्यात किती…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राज्य शासनाच्या वतीने राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ राज्यात २४ लाख ८० हजार ३८० आणि जिल्ह्यातील ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारकांना होणार आहे.

जिल्ह्यातील एक हजार ८८७ स्वस्त धान्य दुकानातून अंत्योदय योजनेतील साड्यांचे वाटप लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी हेमा बडे यांनी दिली.

राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये या संदर्भातील निर्णय घेतला. राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग संचालनालयाच्या योजने अंतर्गत पुढील पाच वर्षे राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

अंत्योदय रेशन कार्ड धारक प्रत्येक परिवरास दरवर्षी एक साडी रेशन दुकानावर मोफत दिली जाणार आहे. राज्य यंत्रमाग महामंडळाचे वतीने ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेसाठी साड्यांचे उत्पादन, वाहतूक, जाहिरात, प्रसिद्धी, साठवणूक, हमाली यासाठी येणारा खर्च महामंडळाला राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे.

राज्यात अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या २४ लाख ८८ हजार ३२० आहे. तर नगर जिल्ह्यात ८८ हजार ३७ अंत्योदय शिधापत्रिका धारक आहेत.

शिंदे-फडणवीस-पवार यांचे महायुती सरकारने आनंदाचा शिधा योजनेपाठोपाठ मोफत साडी योजनेची सुरुवात केली आहे.

त्याची अंमलबजावणी होवू घातली आहे. जिल्ह्यासाठी ६३ हजार ४०२ साड्या उपलब्ध झाल्या आहेत. पुढील दोन दिवसात उर्वरीत साड्या प्राप्त होणार असून स्वस्त धान्य दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे.

तालुकानिहाय साड्यांची संख्या
शेवगाव – ९ हजार ७५८ श्रीगोंदे- ८ हजार ७४४ नेवासे- ७ हजार १५७ कोपरगाव – ६ हजार ७७८ संगमनेर – ६ हजार ३८६ पाथर्डी- ६ हजार २६७ अकोले – ६ हजार १९९ राहुरी- ६ हजार १५२ श्रीरामपूर – ५ हजार ७३४ जामखेड – ५ हजार ६३८ राहाता – ५ हजार ५९२ नगर- ४ हजार ७४६ पारनेर – ३ हजार ६३८ कर्जत- ३ हजार ५४७ नगर शहर- १ हजार ७०१

Ahmednagarlive24 Office