अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील मानोरी-मुसळवाडी रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून या रस्त्याला केव्हा डांबर लागेल, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
पाच आमदार पाहिलेल्या या रस्त्याचे विद्यमान मंत्र्यांच्या काळात तरी भाग्य उजळेल का, अशी शंका ग्रामस्थांना आहे. स्वातंत्र्यानंतर या रस्त्याच्या खडीकरणाशिवाय कोणतेही काम झालेले नाही.
खडीकरण होऊनदेखील खूप वर्षे झाल्याने आता त्याचे अवशेषच शिल्लक आहेत. माजी आमदार प्रसाद तनपुरे, चंद्रशेखर कदम, शिवाजी कर्डिले, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, विद्यमान आमदार लहू कानडे व विद्यमान मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा कार्यकाळ या रस्त्याने पाहिला आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण झाल्यास मानोरी, केंदळ खुर्द, केंदळ बुद्रूक, आरडगाव, ब्राह्मणी, शिलेगाव, कोंढवड, वळण येथील ग्रामस्थांना श्रीरामपूरला जाणे सोपे होईल. विद्यार्थ्यांचा प्रवासही सुकर होईल.
दोन तालुक्यांना जोडणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असताना दुर्लक्ष का होते, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या कामाबाबत आंदोलनेही झाली आहेत.
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री तनपुरे यांनी या रस्त्याची पाहणी करून काम मंजूर झाल्याची घोषणा केली, परंतु अजून कामाला सुरुवात न झाल्याने आणखी किती दिवस वाट पहावी लागेल हे काळच ठरवणार आहे.