अहमदनगर बातम्या

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायतचे काम करणे सदस्यास भोवले, जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कडगाव ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य दत्तू उर्फ दत्तात्रय रंगनाथ कोरडे यांनी ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या करारात व सेवेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होऊन रकमा काढल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी नुकताच पारित केला.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कडगाव या ग्रामपंचायतीची सन २०२३ मध्ये पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक झाली. सदरील निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून दत्तू उर्फ दत्तात्रेय रंगनाथ कोरडे हे निवडून आले.

ते निवडून आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतच्या करारात सहभाग घेऊन ४८०० रुपये ही रक्कम पाणीपुरवठा पाईपलाईन दुरुस्तीसाठी तसेच ६४०० रूपयांची रक्कम रस्ता दुरुस्तीसाठी धनादेशाद्वारे स्वतःच्या नावाने काढून घेतली. त्यानंतर सदरील रेकॉर्डमध्ये काही फेरफार देखील करण्यात आले.

या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन गावातील राजेंद्र रामभाऊ कोरडे यांनी सदरील सदस्य दत्तु कोरडे यांना ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र करण्यासाठी वकील गोरक्ष पालवे यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांचे समोर ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १४ एक व सोळा प्रमाणे त्याने करारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेऊन सदस्य पदाचा दुरुपयोग करून रकमा काढल्यामुळे त्यास सदस्य पदी अपात्र करणे कामे अर्ज दाखल केला होता.

सदरचा अर्ज जिल्हाधिकारी यांचे समोर सुनावणी कामी आल्यानंतर सदरील दत्तू कोरडे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस काढून म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यांनी म्हणणे मांडले, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण तसेच पाथर्डी येथील गटविकास अधिकारी यांचेकडील अहवाल पाहून व कागदपत्राचे अवलोकन करून सदरील सदस्य यांनी ग्रामपंचायतीच्या करारात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग घेऊन काही रक्कम काढल्याची बाब ग्रामपंचायतचे बँक खात्यावरून दिसत असल्याचे पाहून सदरील सदस्यास अपात्र करण्याचे आदेश नुकतेच पारित केले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office