आंदोलनाचा इशारा देताच पाच मिनिटातच मिळाले लेखी आश्वासन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- पावसाळा सुरु झाला असून बळीराजाचे शेतीतील काम देखील सुरु झाली आहे. यातच अडचणीत सापडलेल्या बळीराजाला मदतीसाठी म्हणून कृषी विभाग काम करत असतो.

मात्र कृषी विभातील अधिकाऱ्यांच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात उतरण्यापूर्वीच मागण्या मान्य झाल्याचा प्रकार नगर तालुक्यात घडलेला दिसून आला.

कामरगाव येथे चार महिन्यांपासून कृषी सहायक पद रिक्त होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्या पदावर तत्काळ नियुक्ती द्यावी, अन्यथा ठिय्या आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आणि अवघ्या पाचच मिनिटात कृषी विभागाने लेखी आश्वासन दिले.

कामरगाव येथे कृषी सहायकाचे पद चार महिन्यांपासून रिक्त आहे. याबाबत ग्रामपंचायतीने तालुका कृषी अधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिले होते.

त्याची दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह सरपंच तुकाराम कातोरे, आजी-माजी सैनिक संघटनेचे सहसचिव पोपटराव ठोकळ, हबीब शेख यांनी कृषी उपसंचालक विलास नलगे यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.

कृषी सहायकाच्या नेमणुकीचा आग्रह धरला व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावर नलगे यांनी सहमती दर्शविली. मंडळाधिकारी जगदीश तुंभारे यांनी लगेचच गणेश पाचपुते यांच्याकडे पदभार दिला व तसे पत्र ग्रामस्थांना दिले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24