अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नेवासे येथे कार्तिक वद्य एकादशीला (११ डिसेंबर) होणारी माउलींची यात्रा रद्द करण्यात आली असल्याची
माहिती संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख यांनी दिली. नेवासे हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान असल्याने कार्तिक वद्य एकादशीला मोठी यात्रा भरत असते.
या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक माउलींच्या “पैस’ खांबाच्या दर्शनासाठी येत असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या फैलावामुळे भाविकांच्या जीवनाला धोका असल्यामुळे
यात्रा उत्सव शासकीय आदेशाचे पालन म्हणून रद्द करण्याचा निर्णय विश्वस्तांनी एकमताने घेतला. भाविकांनी घरीच बसून माउलींचे ध्यान करावे, असे आवाहन देशमुख यांनी गुरूवारी केले.