तुमच्याकडे यंत्रणा, मग रडीचा डाव का खेळता ? अभिषेक कळमकर यांचा सवाल नगरमधील मारहाणीच्या आरोपास प्रत्युत्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुमच्याकडे भरभक्कम यंत्रणा असेल तर असे रडीचे डाव खेळण्याची आवश्यकता नसली पाहिजे. नीलेश लंके यांनी यापूर्वी बऱ्याचदा सांगितले आहे की, निवडणूक निवडणूकीच्या पध्दतीने खेळा.तुमच्या हातून निवडणूक सटतेय हे तुम्ही नगर दक्षिणच्या जनतेला दाखवून देत असल्याचे सांगत नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी डॉ. सुजय विखे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ नगर शहरात प्रभाग ८ मध्ये रॅली तसेच प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान एका महिलेस लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपास कळमकर तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी पत्रकार परीषदेत उत्तर दिले.

कळमकर म्हणाले,या घटनेला राजकीय वळण दिले जात आहे. घटना घडली असेल, त्या महिलेस मारहाण झाली असेल. त्या प्रभागात ज्यावेळी पोलीस चौकशी करतील त्यावेळी सत्य बाहेर येईल.आमच्या विरोधातील जे उमेदवार आहेत. त्यांचे समर्थक घटनास्थळी गोळा होतात. खून, दरोडा अशा घटना घडतात त्यावेळी हे नगरसेवक पाठपुरावा करण्यासाठी का येत नाहीत हा प्रश्‍न इथे उपस्थित होतो.

ज्यावेळी घरातील एका व्यक्तीचा जीव जातो त्याच्या पाठपुराव्यासाठी आपण कधी पुढे येता का ? त्या महिलेस दुखापत झाली असून त्याबाबत महिलेच्या मुलाने प्रतिक्रिया दिली आहे. त्याबाबत पोलीसांनी व्यवस्थित चौकशी करावी. कोणाच्याही दडपणाला बळी नये. गेल्या महिनाभरापासून आम्ही पाहत आहोत. तरूण मुलांना दम दिला जातोय. स्टेटस ठेवले तरी दम दिला जातोय. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय हेतूने पाहिले जात असल्याचे कळमकर म्हणाले.

शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, असा प्रकार रॅलीतील लोकांकडून घडलेला नाही. रस्त्यावर वाद झाल्याची माहीती समजली. बुऱ्हानगर येथील मयुर कदम या तरूणाच्या कुटूंबातील सदस्य तिथे होते. रस्त्यावर काही घडले असेल. आम्ही समाजकारण करणारे लोक माता भगिनींची इज्जत करणारे लोक आहोत.

मान सन्मान देणारे लोक आहोत. रॅलीमध्ये, सभेमध्ये मी स्वतः सहभागी झालो होतो. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून ही घटना घडलेली नाही. घडली असेल तर त्या भागातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडून घडली असेल. त्याचा नीलेश लंके यांच्या निवडणूकीशी, प्रचाराशी काहीही सबंध नाही.

काही राजकीय लोकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास भाग पाडले असावे अशी शक्यता आहे. ही व्यक्ती कोणत्या भागात राहते याची चौकशीही करण्यात यावी. चांगल्या वातावरणात निवडणूक सुरू आहे. आरोप प्रत्यारोप होत असतात. चुकीच्या पध्दतीने चुकीच्या बातम्या फिरवून नगर शहराचे वातावरण कोणीही खराब करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन कदम यांनी केले.