अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : केंद्र सरकारनं कसलंही राजकारण न करता भारतीय सैन्याला पाठबळ देण्याची गरज असून, ‘कोणत्याही परिस्थितीत देशाचं रक्षण करण्याची क्षमता आपल्या तिन्ही सैन्यदलांमध्ये आहे.
भारतीय म्हणून आपण स्वदेशीचा नारा देत व्यापार युद्धातून सैन्याला साथ देऊ,’ असं आवाहन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी तरुणांना केलं आहे.
भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत लाठ्याकाठ्या व दगडांचा मारा एकमेकांवर करण्यात आला.
त्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चीनचे ४३ सैनिक मारले गेल्याचं सांगितलं जात आहे. अवघा देश करोनाच्या संकटाशी झुंजत असताना सीमेवर वाढलेल्या या तणावामुळं चिंतेत भर पडली आहे.
चीनला ‘जशास तसं’ उत्तर देण्याची मागणी होत आहे. तर, जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं आहे.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी एक ट्विट करत केंद्र सरकारनं कसलंही राजकारण न करता भारतीय सैन्याला पाठबळ देण्याची गरज व्यक्त केली आहे. सैन्यासाठी आवश्यक मूलभूत गरजांची पूर्तता झाली नाही, हे कॅग २०२० च्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.
सैन्यासोबतच सरकारनं व्यावसायिक दृष्टीनं युवांना ताकद द्यायला हवी. तसं झाल्यास व्यापाराच्या माध्यमातून भारतीय तरुण चीनला धडा शिकवू शकतात.
भारतीय वस्तूंचं उत्पादन व वापराला प्राधान्य देऊन देशातील प्रत्येक नागरिक व्यापार युद्धातून सैन्याला साथ देऊ शकतो,’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews