Ahmednagar News : पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदी पात्रात रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश रमेश गोडसे (वय ३२, रा. सुकेवाडी रोड, संगमनेर) असे नदीपात्रात बुडालेल्या युवकाचे नाव आहे. शैलेश हा आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी प्रवरा नदीपात्रात गेला होता.
रविवारी दुपारी संगमनेर खुर्द परिसरातील प्रवरा नदी पात्रात ते पोहण्याचा आनंद घेत होते. शैलेश याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीपात्रातील खड्ड्यात बुडाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने शैलेश याचा मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शैलेश हा पेंटर म्हणून काम करत होता. त्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा केला जात असल्यामुळे नदीपात्रामध्ये मोठ- मोठे खड्डे पडले. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने नदीपात्रात यापूर्वीही अशा दुर्घटना अनेकदा घडल्या आहेत.