Ahmednagar News : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची पटसंख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. काही शाळा याला अपवाद आहेत. परंतु बऱ्याच जिल्हा परिषदेच्या शाळांना पटसंख्या कमी असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
अनेक ठिकाणी विद्यार्थी संख्या आहे ५ किंवा १० व त्यांना शिकवायला आहेत तब्बल २ शिक्षक. आता यावर मोठा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४५ शाळांचे ११ समूह शाळेत विलिनीकरण करण्यात येणार आहे.
विद्याथ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी हा या उपक्रमातील उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
शिक्षकांची पदे कमी न करता समूह शाळेचा निर्णय
शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दुर्गम तसेच अतिदुर्गम भागातील वाडी वस्तीवर जिल्हा परिषदेच्या शाळा निर्मिती करण्यात आली होती, साधारण १ ते दीड किलोमीटरच्या अंतरावर शाळा असे धोरण अवलंबले होते.
परंतु याने शाळांची संख्या साडेतीन हजारांवर पोहोचली. परंतु शाळेतील पटसंख्या सातत्याने कमीच होत गेली. अनेक शाळांमध्ये पाच ते दहा मुलांसाठी दोन शिक्षक कार्यरत असल्याचे सध्या चित्र आहे.
आता या शाळा बंद न करता तसेच शिक्षकांची पदे कमी न करता समूह शाळेच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे तसेच सांघिक भावना निर्माण व्हावी या हेतूने समूह शाळा करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
‘या’ शाळांची समूह शाळेसाठी निवड
पारनेर तालुका – जामगाव, कर्जुले हर्या, खडकवाडी, पारनेर मुली, पिंपळगाव रोठा, राळेगणसिद्धी, हंगा, वडझिरे
राहता तालुका – राहता, कोल्हार, लोणी
एकूण ११ मोठ्या शाळांची समूह शाळेसाठी निवड