file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्याला मंगळवारी पावसाने पुन्हा झोडपून काढले आहे. शहरात पावसाची रिमझिम सुरूच होती. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नगर शहर व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात शेवटच्या दोन दिवसात अतिवृष्टी झाली. प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागाला या पावसाचा फटका बसला होता.

त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून शहर व जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

सोमवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला, त्यानंतर मंगळवारी शहरासह ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम होता.जिल्ह्यात आतापर्यंत ५३३ मिलिमीटर पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासात झाला इतका पाऊस :- नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात पाऊस झाला असून,नगर ३, ,पारनेर १४, श्रीगोंदे १०, कर्जत १२, जामखेड १२ ,शेवगाव १२, पाथर्डी १२, नेवासे १२, राहुरी ८ ,संगमनेर ५, अकोले १२, कोपरगाव ५, श्रीरामपूर १२, राहाता ६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात मंगळवार ते बुधवारी विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. भंडारदरा, निळवंडे, ओझर व नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.