अहमदनगर Live24 टीम, 20 एप्रिल 2022Ahmednagar Zp :- जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत २१ एप्रिलपासून ‘गोवंश गोपालक उन्नती अभियान’ राबवण्यात येणार आहे. पशुवैद्यकीय सेवांचा गुणात्मक दर्जा सुधारणे व जिल्ह्यातील दूध उत्पादनात वाढ व्हावी.

या उद्देशाने फेब्रुवारी २०२३ पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संजय कुमकर यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा हा पशुपालन व दुग्धव्यवसाय यामध्ये महाराष्ट्रात अग्रेसर आहे. राज्यातील सर्वात जास्त १६ लाख गोवंशीय पशुधन जिल्ह्यात आहे.

सध्या महाराष्ट्रातील सर्वात जास्त दूध उत्पादन दैनंदिन २९ लाख लिटर जिल्ह्यात होते. जिल्हा परिषदेच्या २१६ पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत जिल्ह्यात पशुवैद्यकीय सेवा दिल्या जातात.

याला आणखी चालना देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे तांत्रिक प्रशिक्षणापासून याची सुरवात होणार आहे.

मे महिन्यात पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींचा आढावा घेऊन आवश्यक ठिकाणी पशुसंवर्धन विभागास उपलब्ध असलेल्या बांधकाम निधीतून दुरुस्ती कामे व सुशोभीकरण आराखडा तयार करण्यात येईल.

जून महिन्यात वैरण विकास विषयक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल. जूलै ते नोव्हेंबर या चार महिन्यांत वंध्यत्व निर्मूलन शिबिरे सुप्तावस्थेतील स्तनदाह रोगनिदान व उपचार हा कार्यक्रम राबविण्यात येईल.

डिसेंबरमध्ये अकोले तालुक्यातील राजुर येथे उत्कृष्ट डांगी जनावरांचे प्रदर्शन घेण्यात येणार आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी महिन्यात आदर्श गोपालक पुरस्कार व आदर्श पशुवैद्यकीय दवाखाना पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल‌.

फेब्रुवारीमध्ये या अभियानाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गोपालकांना पशुखाद्य व आवश्यक औषधे खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वितरित करण्यात येतील.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट गोपालकांची निवड करून त्यांना ‘आदर्श गोपालक पुरस्कार’ देण्यात येईल. तसेच तालुकानिहाय उत्कृष्ट कामकाज असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येईल