file photo

अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- अजित पवार यांच्यावर आयकर विभागानं मोठी कारवाई केलीय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले.

भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते.

भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल करण्यात आहे.

केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असंही मलिक म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार आपली जबाबदारी पार पाडत असताना केंद्रसरकार सत्तेचा गैरवापर करुन राज्यसरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या प्रयत्नाला राज्यसरकार किंवा त्यातील एकही व्यक्ती न घाबरता लढा देणार, असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला.