मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा ३ मे पर्यंत अल्टिमेटम (Ultimatum) दिला होता.

त्यानंतर राज्यातील काही मनसे कार्यकर्त्यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना चांगलेच खडसावले आहे.

अजित पवार म्हणाले, भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) काही नियमावली दिली आहे. त्यानुसार राज्यात परवानगी आहे. त्यामुळे कोणी अल्टिमेटम देणार असेल तर ते चालणार नाही.

सर्व गोष्टी कायद्यानुसारच होणार. कोणाला अल्टिमेटम द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या. ही काही हुकूमशाही नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

कायदा हातात घेण्याचे धाडस कुणी करू नये. न्यायव्यवस्था जो वेळोवेळी निर्णय देईल, त्याची अंमलबजावणी करणे सरकारला बंधनकारक आहे, असे ते म्हणाले.

त्यामुळे राज्य कायद्यावर, संविधानाने चालते, अल्टिमेटमवर नाही. कोणताही राजकीय पक्ष असेल, त्याने असे वागणे योग्य नाही. निर्णय करायचा आहे, तो सर्वांनाच बंधनकारक असेल. असा इशाराच अजित पवार यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 2005 ला हा निर्णय दिला आहे. त्यानुसार सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच ध्वनीक्षेपकाचा वापर करता येतो. रात्री दहापासून सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर वापरता येत नाही.

रमजान ईद तसेच अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताच अनुचित प्रकार घडला नाही, असे अजित पवार म्हणाले आहेत.

उत्तर प्रदेशातच्या भोंग्यांच्या परिस्थितीविषयीही त्यांनी माहिती दिली. तर महापुरुषांचे नाव आपण घेतो, त्यांच्या विचारावर आपण चालतो. त्यामुळे कायदा पाळा असे आव्हानही पवारांनी केले आहे.