अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- शहरातील सावेडी रोड येथे असलेल्या सय्यद पीर बाबा यांच्या मजार वर जाण्यासाठी भाविकांना रस्ता खुला करुन देण्याच्या मागणीचे स्मरणपत्र महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आले.

यापुर्वी दोन वेळेस सय्यद पीर बाबाच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची मागणी करण्यात आली होती. या दखल न घेतल्याने स्मरणपत्र देऊन उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी रिपाईचे उपनगर उपाध्यक्ष जावेद सय्यद, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, दिनेश पाडळे, जमीर इनामदार, संतोष पाडळे आदी उपस्थित होते.

शहरातील सावेडी रोड येथे एका जागा डेव्हलपर्सने कमर्शियल बांधकाम सुरु केले आहे. मात्र बांधकाम करत असताना सय्यद पीर बाबांच्या मजारवर जाण्यासाठी रस्ता अडवला आहे. मजारवर जाण्यासाठी भाविकांचा रस्ता बंद झाला आहे. बाबांच्या मजारला खेटून सदरचे बांधकाम सुरु असून, भाविकांना दर्शन घेण्यास संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे.

भाविक संयम व लोकशाहीच्या मार्गाने पाठपुरावा करीत असून, या विषयाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. यासाठी त्वरीत सय्यद पीर बाबा यांच्या मजार वर जाण्यासाठी भाविकांना रस्ता खुला करुन देण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.