अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. कुठे घर फोडण्यात आले, कुठे दुकान तर कुठे मोटारसायकलीच चोरट्यांनी लंपास केल्या.

यामुळे ऐन सणोत्सवात जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा – सुव्यवस्था धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच श्रीरामपूर शहरातील बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले असून येथील मध्यवस्तीत असलेल्या म्हाडा कॉलनीत तीन घरे फोडून चोरट्यांनी सोन्यासह रोख रक्कम चोरून नेली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मध्यवस्तीत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरातील श्रीदत्त म्हाडा हाउसिंग सोसायटीत बिल्डिंग नंबर 3 ए मध्ये गिरीश जगधने यांचे बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरात ठेवलेली रोख रक्कम चोरून नेली.

दुसरी घटना :- यानंतर चोरट्यांनी बिल्डिंग नंबर 2 मधील विक्रांत लोखंडे यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून घरातील कपाटातुन सोन्याचे दागिने व काही रोख रक्कम लंपास केली.

तिसरी घटना :- त्यानंतर चोरट्यांनी त्याच बिल्डिंगमधील निलेश म्हस्के यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकापाचक केली. म्हस्के कुटुंब बाहेरगावी असल्याने त्यांच्या घरातून किती रक्कम चोरीला गेली हे समजू शकले नाही.

घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली. याप्रकरणाचा पुढील अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.