अहमदनगर Live24 टीम, 24 ऑक्टोबर 2021 :-  दारू दिली नाही म्हणून आईला शिविगाळ करून मारहाण करणाऱ्या वडिलांना मुलाने लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला.

तालुक्यातील वासुंदे येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बाळासाहेब झावरे (५०) असे मृताचे नाव आहे. सरपणावर पडून वडिलांचा मृत्यू झाल्याचा बनाव मुलगा राहुल झावरे याने केला होता.

मात्र, पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांना संशय आल्याने त्यांनी कसून चौकशी केली असता मुलाने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. त्यानंतर आईच्या फिर्यादीवरून मुलगा राहुल (२५) याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बाळासाहेब झावरे (५०) नेहमी दारू पिऊन पत्नी मंदा यांना मारहाण करीत. शुक्रवारी रात्री दारू पिऊन आल्यावर त्यांनी पत्नी मंदा यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

त्यानंतर पत्नीला घरात कोंडून घेत दाराला कुलूप लावले. काही वेळानंतर त्यांचा मुलगा राहुल देखील दारू पिऊन मित्रासोबत घरी आला. घराला लावलेले कुलूप पाहून मुलगा व वडिलांमध्ये वाद झाला.

त्यानंतर वडिलांनी कूलूप उघडून सर्वांनी घरात प्रवेश केला. घरात गेल्यानंतर वडिलांनी पुन्हा पत्नी मंदा यांच्याकडे दारू मागितली. मात्र मंदा यांनी दारू दिली नाही.

त्यावेळीही त्यांनी शिवीगाळ करून पत्नीला मारहाण केली. मंदा यांनी स्वयंपाक केल्यावर सर्वांनी जेवण केले. त्यानंतर वडील शेताकडे गेले.

वडिलांच्या जाचामुळे मुलगा राहुलच्या मनात असंतोष होता. आईला मारहाण होत असल्याने संतापलेल्या राहुलने पाठीमागून जात वडील बाळासाहेब यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.

त्यात त्यांच्या डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. वडील गंभीर झाल्याचे लक्षात आल्यावर राहुलने रूग्णवाहिका बोलावून त्यांना टाकळीढोकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलवले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. वडिलांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यावर राहुलने टाकळी ढोकेश्वर येथील पोलिस दूरक्षेत्रात जाऊन बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा बनाव असल्याचे लक्षात आले.