अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यात पठार भागातील माहुली (खंदरमाळ) येथे गावातील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षानेच राग अनावर झाल्यामुळे त्यांनी एकास मारहाण केल्याची घटना घडली आहे.

बोलण्यात केलेल्या अडथळ्याच्या कारणातून झालेल्या बाचाबाचीतून एकमेकांवर दगडांनी प्रहार करण्यात आला. याप्रकरणी दोघांनीही घारगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली आहे.

याप्रकरणी अशोक काशिनाथ गाडेकर वय रा. माहुली यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महामार्ग टोलनाक्यावरील काही कर्मचाऱ्यांशी बोलत उभे असताना रामनाथ कजबे यांनी बोलण्यात हस्तक्षेप केला.

या वादातून कजबे यांनी डोक्यात दगड मारून गाडेकर यांना जखमी केले. रामनाथ भाऊसाहेब कसबे वय ५६ रा. खंदरमाळवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, कसबे गावातील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आहेत.

शुक्रवारी सकाळी हॉटेल राजस्थानजवळ गर्दी झालेली पाहून कसबे तेथे गेले. त्याठिकाणी अशोक गाडेकर हे टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना अरेरावी करीत असल्याने तंटामुक्ती या नात्याने त्यांनी हस्तक्षेप केला.

यावेळी गाडेकर यांची पत्नी वैशाली, भाऊ सुनील, भावजय स्वाती या तिघांनी शिवीगाळ करीत खाली पाडून कसबे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. याप्रकरणी परस्परविरोधी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.