ब्रिटिश काळापासून पारधी समाजावर असलेला गुन्हेगारीचा शिक्का पुसायला तयार नाही. पारधी कुटुंबातील शिकलेले तरूण आणि नव्या पिढीने वेगळे व्यवसाय सुरू केले तरीही त्यांच्यावर संशय कमी होत नाही.

अशाच संशयापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी, जणू आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी बीड जिल्ह्यातील एका पारधी कुटुंबाने स्वत:च्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. कोणी पोलिस संशय घेऊन आले तर या कॅमेऱ्यात पाहून आपण त्यावेळी कोठे होतो, हे तपासा, असे सांगण्याची सोय म्हणून हे कॅमरे बसवून घेतले आहेत.


वाकी ता-आष्टी जि-बीड येथील वाघजाई वस्तीवर पारधी समाजातील सात कुटुंबांची वस्ती आहे. एकूण १५ व्यक्तीचे कुटुंब ५० वर्षापासून वाकी या ठिकाणी स्वतःची जमीन कसून आणि मोलमजुरी करून उपजिविका चालवीत आहे. या कुटुंबांमध्ये एकच कर्तापुरुष तो म्हणजे शामल नवनाथ काळे.

तो दहावी उत्तीर्ण आहे. काळे यांच्या कुटुंबातील संदीप ईश्वर भोसले हा नवनाथ काळे यांचा जावई. त्यांच्यातील वाद आणि अन्य घटना यावरून पोलिस सतत काळे याच्याकडे चौकशीला येतात.

औरंगाबाद, आष्टी श्रीगोंदा, नगर, बीड येथील पोलीस शामल नवनाथ काळे याला संशयित गृहित धरून वस्तीवर येतात.त्यामुळे त्याने आता स्वत:च्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. पोलिस आले की त्यातील फुटेज दाखवून आपण येथेच होतो, हे तो दाखवून देतो.

या समाजावर इंग्रजांच्या काळापासून गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे. त्या लोकांच्या बाजूने खूप कमी लोक बोलताना दिसतात, परंतु आता या समाजातील तरुण व महिला स्वतःच्या व कुटुंबाच्या बचावासाठी वेगवेगळे पर्याय घेऊन पुढे येत आहेत.

त्यापैकी स्वतःच्या घराला सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवणे हा मोठा पर्याय या आदिवासींना पारधी कुटुंबाने निवडला आहे. एवढे करूनही आत्यचार नाही थांबल्यास पुढील आंदोलन पुकारले जाईल, असे भटक्यांचे नेते ॲड.डॉ.अरुण जाधव यांनी सांगितले.