Maharashtra news : पोलिसांतील ‘मलाईदार’ शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेत नियुक्ती मिळणे आता अवघड झाले आहे.

यासाठी आता पूर्वीप्रमाणे वशिलेबाजी नव्हे तर गुणवत्तेवर अधारित परीक्षा द्यावी लागणार आहे. नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी पाचही जिल्ह्यांतील पोलिस अधीक्षकांना यासंबंधीचा आदेश दिला आहे.नाशिक परिक्षेत्रातील नाशिक ग्रामीण, धुळे, जळगाव, नंदूरबार व अहमदनगर या पाच जिल्ह्.यांसाठी हा आदेश आहे.

या जिल्ह्यांत एलसीबीमध्ये खोगीर भरती केल्याचे आढळून आल्यावर शेखर पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. यासंबंधी पोलिस महासंचालकांनी पूर्वीच योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. त्या आधारेच हे परिपत्रक काढण्यात आले आहे.

नाशिक परीक्षेत्रात आता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात नियुक्ती हवी असणारांची गुन्हेशोधावर ७५ गुणांची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यात ४० गुण वैकल्पिक (ऑब्जेक्टीव्ह) व ३५ गुणांची पॅक्टीकल परीक्षा असेल.

मेरीट लिस्टप्रमाणे एलसीबीत नेमणूक करण्यात येईल. याशिवाय आणखी संबंधितांचे सेवा पुस्तक पाहून काटेकोर तपासणीनंतरच त्यांची नियुक्ती या शाखेत दिली जाणार आहे.