Ahmednagar News : अल्पवयीन मुलीची छेड काढणार्‍या हर्षल दीपक काळभोर (वय 24 रा. भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) याला भादंवि कलम 354 (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा कलम 12 (पोक्सो) अन्वये दोषी धरून सहा महिने सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी हा निकाल दिला.

या गुन्ह्यातील आरोपी अशोक गोकुळ शेळके यास पुरावा न आल्याने सोडुन देण्यात आले आहे. सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील मनिषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी कामकाज पाहिले.

अहमदनगर शहरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीस हर्षल काळभोर हा विनाकारण त्रास देत होता. फोन न उचलल्यामुळे ती कॉलेजला जात असताना पाठलाग करून,‘तु माझा फोन का उचलत नाही, मला तुझ्याशी फ्रेंडशीप करायची आहे, तु माझ्या बरोबर बाहेर फिरायला चल’, असे वर्तन करीत असे.

पीडित मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर हर्षल काळभोर व त्याच्या साथीदाराने पीडितेच्या वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून 21 नाव्हेंबर, 2017 रोजी कोतवाली पोलीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागवे यांनी केला. पैरवी अधिकारी महिला पोलीस उत्कर्षा वडते यांनी सहकार्य केले.