अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :- क्रूझ ड्रग्स प्रकरणात अखेर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मंजूर करण्यात आलाय.

मुंबई उच्च न्यायालयात जवळपास तीन दिवस दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर हा निर्णय घेतलाय. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला.

दरम्यान, आज जामीन मंजूर करण्यात आला असला तरी हे तिघेही आज कारागृहाबाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. त्याबाबत आर्यन खानचे वकील मुकूल रोहतगी यांनी माहिती दिलीय आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार,

न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट उद्या हाती येणार आहेत. ते जेल प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. आत्ताच जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असल्यामुळे ही कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो.

दरम्यान, कोणत्याही आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय आला आणि त्या आरोपीला जामीन मंजूर झाला, तर त्यासंदर्भातला कोर्टातला आदेश आणि ऑपरेटिव्ह जेलबाहेर लावण्यात आलेल्या पेटीमध्ये टाकावे लागतात. जेलबाहेरच्या या पेट्या रोज सकाळी साधारणपणे ८ वाजता आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास उघडतात.

आजची ही वेळ गेल्यामुळे आता उद्या सविस्तर निकालाची प्रत आणि कागदपत्र हाती आल्यानंतर ते तुरुंग प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खान बाहेर येऊ शकणार आहे.