Maharashtra news : माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना केंद्रीय गृहखात्याने वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सदाभाऊ खोत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेल्या भाजपशी संबंधित नेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

केंद्रीय गृहखात्याने यासंदर्भात मुंबई पोलीस आणि संबंधित सुरक्षा दलांना आदेशाचे पत्र पाठवले आहे. त्यानुसार खोत यांना आजपासूनच वाय दर्जाची सुरक्षा प्राप्त झाली आहे.आतापर्यंत केंद्र सरकारने राज्यातील भाजपच्या अनेक नेत्यांना विशेष सुरक्षा पुरवली आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहखात्याने अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांनाही वाय प्लस दर्जाची सुरक्षा प्रदान केली होती. खोत यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला होता.

विशेषतः पवार कुटुंबीयांकडून मला धोका आहे. कारण, ही माणसं कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण माझा प्राण गेला तरी चालेल पण, तुमची व्यवस्था आणि मस्तावालपणे लुटीच्या माध्यमातून उभारलेला चिरेबंदी वाडा पाडल्याशिवाय हा सदाभाऊ शांत बसणार नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांना ही सुरक्षा व्यवस्था देण्यात आली आहे.