file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुमित वर्मा यांनी शहरातील खड्यांच्या प्रश्नावर सुरू केलेल्या ‘जाब विचारा, आंदोलनाला वेगळे वळण लागल्याचे चित्र आहे.

मनपाच्या अखत्यारीत नसलेल्या एका नादुरुस्त रस्त्यावरून एकाने अरेरावी व दमदाटी केल्याप्रकरणी महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेत प्रकरणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी सोशल मिडीयावर एक जाहिरात प्रसिद्ध करून त्यामध्ये शहर अभियंता इथापे व शाखा अभियंता यांचा मोबाईल नंबर प्रसिद्ध करून नागरीकांना “जाब विचारा” असे आवाहन केलेले आहे.

अनेक नागरीकांकडून रस्त्यांच्या खड्डयांबाबत फोन केले. या सर्वांना वस्तुस्थितीबाबत व मनपा करत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती देवूनही जाणीवपूर्वक त्रास देण्याचे हेतुने रात्री-अपरात्री फोन केले जात असल्याचे इथापे यांनी म्हटले आहे.

इथापे हे कार्यालयीन कामकाज करत असताना एके दिवशी त्यांना मोबाईल नंबरवरून एका व्यक्तीने कल्याण रोडच्या खड्डयांबाबत विचारणा केली.

इथापे यांनी त्यांना सदर रस्ता मनपाच्या अखत्यारीत नसून संबंधीत विभागाकडे संपर्क करावा, असे सांगितले. यामुळे रागावलेल्या त्या व्यक्तीने अरेरावीची,

एकेरी भाषा वापरून दमदाटी करून शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार इथापे यांनी केली आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.