अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2021 :- मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी एका किराणा दुकानात काही वस्तू खरेदी केल्या,नंतर पाण्याच्या बाटलीची मागणी केली. दुकानदार पाणी आणण्यासाठी गेला अन या भामट्यांनी हीच संधी साधून त्याचा गल्लाच साफ केला.(Ahmednagar Crime)

ही घटना पारनेर शहरातील साई किराणा दुकानात झाली. या प्रकरणी संजय नानाभाऊ औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पारनेरमध्ये भैरवनाथ गल्लीत औटी यांचे साई किराणा नावाचे दुकान आहे. त्या दिवशी दुकानात औटी यांची मुलगी होती. दरम्यान लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरुन दोघेजण दुकानासमोर आले.

त्यांनी दुकानातुन २०० रुपयांचे किराणा साहित्य घेतले. हा सर्व हिशोब सुरू असताना यातील एकाने पाण्याची बाटली मागितली.

मुलगी पाण्याची बाटली आणण्यास गेली असता या दोघांनी दुकानातील १७ हजाराची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. याप्रकरणी संजय औटी यांना माहिती मिळताच त्यांनी पारनेर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.