अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2022 Ahmednagar News :  सध्या राज्यात पुढारी केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे.

नुकतेच याचा प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला. येथे कुकडीच्या पाण्यासाठी शेतकऱ्याने थेट स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी, येथील कुकडी कालव्याचे आवर्तन सुरू असून,मात्र १३२ लिंक कालव्याला पाणी सुरू असून हे पाणी दोन मोऱ्याजवळ आले असताना कुकडीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पाणी टेलला नेण्यासाठी पाणी बंद करण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

त्यातच या परिसरातील शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शेतकऱ्यांनी पूर्ण क्षमतेने पाणी मिळावे यासाठी आंदोलन सुरू केले.

यावेळी कुकडीच्या अधिकारी पाण्याच्या बाबतीत चालढकल करत असल्याने शेतकरी आक्रमक झाले. एका शेतकऱ्याने अचानक अंगावर डिझेल ओतून घेतले.

यावेळी सुदैवाने उपस्थित असलेले पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याचे हातातील डिझेल ड्रम काढून घेतल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलक शांत झाले.