ऑटोमोबाईल

बजाजने इतिहास घडवला ! लॉन्च केली जगातील पहिली सीएनजी बाईक, गडकरींच्या हस्ते पुण्यात झाले लॉन्चिंग, किंमतीबाबत गडकरी काय म्हणालेत ?

Published by
Tejas B Shelar

Bajaj CNG Bike : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य भारतीय इंधन दरवाढीमुळे संकटात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. अशा परिस्थितीत आता पेट्रोल आणि डिझेल वाहनांऐवजी इतर पर्यायी वाहनांची मागणी वाढत आहे. यामुळे अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांचा खप वाढला आहे.

अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. या इलेक्ट्रिक वाहनांना नागरिकांच्या माध्यमातून चांगला रिस्पॉन्स सुद्धा मिळत आहे. सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे देशात सीएनजी वाहनांची देखील क्रेझ वाढत चालली आहे.

आतापर्यंत बाजारात सीएनजी कार उपलब्ध होत्या. मात्र आता सीएनजी बाईक देखील लॉन्च झाली आहे. जगातील पहिली सीएनजी बाईक आपल्या भारतात लॉन्च झाली हे विशेष. बजाज कंपनीने जगातील पहिली सीएनजी बाईक पुण्यात लॉन्च केली आहे.

आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बाईकचे लॉन्चिंग झाले आहे. यामुळे सध्या या बाईकची संपूर्ण देशभरात मोठी चर्चा सुरु आहे. दरम्यान आता आपण बजाजने लॉन्च केलेल्या या सीएनजी बाईकचे वैशिष्ट्ये, मायलेज आणि किमती विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे बजाजची पहिली सीएनजी बाईक

बजाज कंपनीने बजाज फ्रीडम 125 ही जगातील पहिली सीएनजी बाईक आज लॉन्च केली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये आयोजित सोहळ्यात केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही बाईक लॉन्च केली. या बाईकमध्ये 125cc क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

ही पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रीड बाईक आहे. या बाईकचे इंजिन पावरफुल आहे. हे इंजिन 9.5 PS ची पॉवर आणि 9.7 Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जात आहे. या हायब्रीड बाईक मध्ये कंपनीने 2 लिटरचे पेट्रोल फ्युएल टँक आणि 2 किलोग्रॅमची सीएनजी टँक दिली आहे. ही गाडी तीन व्हेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.

कंपनीने फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम या तीन व्हॅरियंटमध्ये ही गाडी लॉन्च केली आहे. डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक अशा दोन ऑप्शन्स मध्ये ही गाडी उपलब्ध होणार आहे. ही गाडी एकूण सात कलर ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आली आहे, म्हणून ग्राहकांना आवडीनुसार आपला कलर सिलेक्ट करता येईल अशी आशा आहे.

बाईकची किंमत काय आणि मायलेज किती देते?

या बाईकच्या मायलेज बाबत बोलायचं झालं तर दोन किलो सीएनजी मध्ये ही गाडी 230 किलोमीटर पर्यंत धावणार आहे. तसेच बाईक फुल टँकमध्ये म्हणजे 2 लिटर पेट्रोल + 2 किलो सीएनजीमध्ये 300 किमीपर्यंत धावणार आहे.

या बाईकची किंमत ही सर्वसामान्यांना परवडेल अशीच राहणार असा कंपनीचा दावा आहे. या बाईकच्या लॉन्चिंग सोहळ्या वेळी नितीन गडकरी यांनी या गाडीची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. दरम्यान कंपनीने देखील या बाईकची किंमत एक लाख रुपयांच्या आसपासच ठेवली आहे.

बजाज कंपनीने फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम या तीन मॉडेल ची किंमत अनुक्रमे 1 लाख 10 हजार , १ लाख ५ हजार आणि ९५ हजार एवढी ठेवली असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com