Maruti Suzuki Announces Price Hike : मारुती सुझुकीच्या गाड्या सध्या महागल्या आहेत. कंपनीने 10 एप्रिल रोजी म्हणजेच कालपासून स्विफ्ट आणि ग्रँड विटारा सिग्माच्या निवडक प्रकारांच्या किमती वाढवल्या आहेत. स्विफ्टची किंमत 25,000 रुपयांनी वाढवण्यात आली असून ग्रँड विटारा सिग्मा व्हेरियंटच्या किंमतीत 19,000 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने या वर्षात दुसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवल्या आहेत.
यापूर्वी, वाढती महागाई आणि वस्तूंच्या किमतीचा हवाला देत कंपनीने म्हटले होते की, यामुळे वाहन निर्मितीचा खर्च महाग होत आहे. यामुळे जानेवारी महिन्यात मारुतीने सर्व मॉडेल्सच्या किमतीत 0.45 टक्के वाढ जाहीर केली होती.
जानेवारीमध्ये कारच्या किमती वाढवण्यापूर्वी मारुतीने सांगितले होते की, “आम्ही काही काळापासून वाढीव इनपुट कॉस्ट सहन करत आहोत, परंतु सध्याच्या बाजार परिस्थितीमुळे वाहनांच्या किमती किंचित वाढवण्याचा दबाव आहे, म्हणून काही मॉडेल्सच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत.
मार्च महिन्याच्या ऑटो विक्रीच्या आकडेवारीनुसार, मारुतीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारासह एकूण 187,196 युनिट्सची विक्री केली आहे. हा आकडा मार्च 2023 च्या तुलनेत 14 टक्के अधिक आहे.
मारुती सुझुकीने 2023-24 या आर्थिक वर्षात आतापर्यंतची सर्वोच्च एकूण विक्री गाठली आहे. या कालावधीत कंपनीने 2,135,323 कार विकल्या. यामध्ये 1,793,644 युनिट्सची देशांतर्गत विक्री आणि एकूण 283,067 वाहनांची निर्यात समाविष्ट आहे.