Maruti Suzuki Car Price : भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने आपल्या सर्व वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनीने म्हटले की, महागाई आणि वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आपल्या कारच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाढलेल्या किमती १ जानेवारी २०२४ पासून लागू होणार आहेत.
कंपनीने सोमवारी शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत म्हटले की, एकूण महागाई आणि वाढलेल्या वस्तूंच्या किमती यामुळे खर्चावरील दबाव लक्षात घेऊन कंपनीने १ जानेवारी २०२४ मध्ये आपल्या कारच्या किमती वाढवण्याची योजना आखली आहे.
कंपनीने यावर्षी तिसऱ्यांदा आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी १ एप्रिल रोजी सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. तर १६ जानेवारी २०२३ रोजी सर्व मॉडेल्सच्या किमती १.१ टक्क्याने वाढल्या होत्या.
इनपूट कॉस्ट वाढल्याने वाहनांच्या किमती वाढल्या होत्या. मारुती सुझुकीने ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली आहे. कंपनीने ऑक्टोबरमध्ये १,९९,२१७ युनिट्सची विक्री केली. ही विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्के अधिक आहे. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये १,६७,५२० कारची विक्री केल्याचे सांगितले.
ऑडीच्या किमतीही वाढणार
ऑडी इंडिया कंपनीने देखील १ जानेवारी २०२४ पासून वाहनांच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. कारच्या किमतीत वाढ करण्यामागील कारण ऑडीने मारुती सुझुकीसारखेच दिले आहे.
ऑडी इंडिया क्यू३ एसयूव्हीपासून स्पोर्ट्स कार आरएसक्यू ८ सारख्या आलिशान कारची निर्मिती तसेच विक्री करते. या वाहनांची किमत ४२.७७ लाख रुपयांपासून २.२२ कोटी रुपये इतकी आहे. आता ऑडी कारप्रेमींना पुढील वर्षीपासून कार खरेदीसाठी दोन टक्के अधिक मोजावे लागणार आहेत.