ऑटोमोबाईल

शेतीकामासाठी ‘हे’ ट्रॅक्टर ठरतील पावरफुल! कमी डिझेलमध्ये करतात जास्त काम आणि देतात तगडे मायलेज

Published by
Ajay Patil

Best Mileage Tractor In India:- शेती कामाच्या बाबतीत अगदी शेतीचे पूर्व मशागतीपासून तर पीक लागवड, पिकाचे अंतरमशागत आणि पीक काढणी व शेतीमाल बाजारपेठेपर्यंत नेण्याकरिता मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरचा वापर सध्या केला जातो. तसेच शेतीमध्ये विविध कामांकरिता उपयोगी पडतील असे अनेक यंत्र विकसित करण्यात आले आहेत

व त्यातील बहुसंख्य यंत्र ही ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टरचे महत्व आणखीनच वाढते व त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येते. भारतामध्ये अनेक कंपन्यांची उत्कृष्ट असे ट्रॅक्टर उपलब्ध असून त्यातून शेतकरी त्यांना हवे असलेले व बजेटमधील ट्रॅक्टरची खरेदी करतात.

परंतु त्यातल्या त्यात काही प्रमुख कंपन्यांची जर ट्रॅक्टर बघितली तर ती शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून कमीत कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त काम करण्याची त्यांची क्षमता ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते. त्यामुळे या लेखात आपण अशाच काही ट्रॅक्टरची माहिती घेणार आहोत जे शेतकऱ्यांसाठी व शेतीसाठी फायद्याचे ठरू शकतात.

शेतीसाठी फायद्याचे ठरतील हे ट्रॅक्टर

1- सोनालिका डीआय 745 lll सिकंदर- सोनालिका कंपनीच्या माध्यमातून अनेक उत्कृष्ट असे ट्रॅक्टर लॉन्च करण्यात आलेले आहेत व त्यातील महत्त्वाचे एक म्हणजे सोनालिका डीआय ७४५ lll हे सिकंदर या सोनालिका ट्रॅक्टरच्या श्रेणीतील सर्वाधिक विकले जाणारे ट्रॅक्टर म्हणून ओळखले जाते.

या ट्रॅक्टरचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमी डिझेल वापरते व त्यामुळे जास्तीत जास्त मायलेजकरिता हे ट्रॅक्टर प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरचा मेंटेनन्स देखील खूप कमी असल्याने शेतकऱ्यांचा पैसा वाचतो. या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने 3065 सीसी तीन सिलेंडर इंजिन दिले असून ते 50 एचपी पावर निर्माण करते.

तसेच या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1800 किलो असून यावर दोन वर्षाची वॉरंटी मिळते. या ट्रॅक्टरची किंमत सहा लाख 35 हजार ते सहा लाख 70 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

2- जॉन डियर 5050 डी- जॉन डियर कंपनीचे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते. या कंपनीचे जॉन डियर 5050 डी हे ट्रॅक्टर त्याच्यात वापरलेले प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम असे मायलेज यामुळे जॉन डीअर ट्रॅक्टर पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाचे असे ट्रॅक्टर आहे.

या ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग देण्यात आली असून दोन व्हील ड्राईव्ह आणि चार व्हील ड्राईव्ह अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 2900 सीसी क्षमतेचे तीन सिलेंडर इंजिन दिले असून ते 50 एचपी पावर जनरेट करते.

या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता सोळाशे किलो असून कंपनी या ट्रॅक्टरवर पाच वर्षाची वारंटी देते. ट्रॅक्टरची किंमत सहा लाख 90 हजार ते सात लाख 40 हजार रुपये पर्यंत आहे.

3- महिंद्रा 275 डीआय- भारतातील शेतकऱ्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर विशेष प्रसिद्ध आहेत व त्यातीलच जर आपण बघितले तर महिंद्रा 275 डीआय हे विशेष असे ट्रॅक्टर असून ते त्याचे मायलेज व इतर वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध आहे. तसेच तुम्ही जर या ट्रॅक्टरचे पुनर्विक्री मूल्य बघितले तर ते सर्वात जास्त असल्याने शेतकऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरते.

कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 2048 सीसी क्षमतेचे इंजिन दिले असून ते 39 एचपी पावर जनरेट करते. तसेच हे ट्रॅक्टर डिझेलची देखील मोठ्या प्रमाणावर बचत करते. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता 1500 किलो असून या ट्रॅक्टरवर कंपनी सहा वर्षाची वॉरंटी देते. महिंद्रा 275 डीआयची किंमत पाच लाख 25 हजार ते पाच लाख 45 हजार रुपयांपर्यंत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil