Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रेक्षकांना मारहाण करण्याचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला आहे. मात्र आता पुन्हा एकदा एका महिलेने त्यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.

महिलेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठे ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्याचा निर्णय घेत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही यावर प्रतिक्रिया देत प्रश्न उपस्थित केले आहेत.

अमोल मिटकरी म्हणाले, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर भाजपच्या महिला पदाधिकारी आरोप काय करतात, थेट ३५४ चा गुन्हा दाखल करतात, हे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्यांसाठी फार मोठा शॉक आहे.

हा प्रश्न फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रश्न नाही. त्या महिलेने २४ तासानंतर तक्रार का केली? थेट विनयभंगाचा गुन्हा? एखाद्याला तुम्ही जीवनातून उठवायचं ठरवलंय का? असे प्रश्न अमोल मीटरची यांनी उपस्थित केले आहेत.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर करण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ठाण्यातील वाय ब्रिजच्या उद्घाटन सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे.

याठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यादेखत गर्दीतून वाट काढत असताना आव्हाड यांनी स्वभावाप्रमाणे त्यांचा मार्ग काढला.

उलट ते म्हणतायत, तुम्ही गर्दीत कशाला येताय? यात कुठलीही विनयभंगाची भावना किंवा कृती आहे, असं वाटत नाही. विशेषतः मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे याचे अर्थ लोकांना काय समजायचे, ते समजतात.

गेल्या काही दिवसांपासून आव्हाड यांच्यावर लक्ष केंद्रीत करून, त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, अशी मी त्यांना विनंती करणार आहे. पक्ष त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे.

आपण कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, सरकार येतात आणि जातात, कुणाचा किती विचार केला पाहिजे. त्यामुळे पोलिसांनीही एक मर्यादा ठेवून काम करावे असे जयंत पाटील म्हणाले आहेत.