Ahmednagar City News : हे तर १०० वर्ष टिकणारे जागतिक तंत्रज्ञान ! सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर केले डांबरीकरण, मनपाचा प्रताप


शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे या रस्त्याची पाहणी करत अभ्यास केला आहे. हे तर किमान शंभर वर्षे टिकेल अशा दर्जाचे जागतिक तंत्रज्ञान आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : नगर शहरात चक्क सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरीकरण करण्याचा प्रताप मनपाच्या अभियंत्यांनी केला आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले होते.

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अभ्यास गटाने भिंगाद्वारे या रस्त्याची पाहणी करत अभ्यास केला आहे. हे तर किमान शंभर वर्षे टिकेल अशा दर्जाचे जागतिक तंत्रज्ञान आहे.

शहराच्या आमदारांनी स्वतःच्या प्रभागात स्वतः पुढाकार घेत केलेल्या या अनोख्या उपक्रमाचे मी नगरकरांच्या वतीने कौतुक करतो, असा उपरोधिक टोला यावेळी बोलताना काळे यांनी लगावला आहे.

शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांचा काँग्रेस कडून भांडाफोड सुरू आहे. यात रोज नवनवीन प्रताप समोर येत आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रभाग क्रमांक १४ मधील बुरूडगाव रोड लगत असणाऱ्या एके वन सोसायटी समोरील आयटीआय महाविद्यालया गेट ते भोसले आखाडा रस्त्यावर हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.

यावेळी पाहणी करणाऱ्या काँग्रेसच्या अभ्यास गटामध्ये काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, काँग्रेस सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ, राजू क्षेत्रे, अशोक जावळे आदींसह कार्यकर्त्यांचा चमू यामध्ये सहभागी झाला होता.

यावेळी फेसबुक लाईव्हद्वारे हे तंत्रज्ञान नगरकरांना दाखवण्यात आले. सोशल मीडियात हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून चर्चेला उधाण आले आहे. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काळे म्हणाले की, हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर या परिसरातील सुजाण नागरिकांनी मला फोनद्वारे ही माहिती दिली.

मात्र त्यांनी त्यांचं नाव उघड होऊ नये अशी विनंती केली. त्यांच्या बोलण्यात भीती जाणवत होती. नगर शहरात दहशत आहे. नागरिकांना चुकीच्या गोष्टींबद्दल तक्रार करताना सुद्धा भीती वाटते. माझे नगरकरांना अवाहन आहे, नगरकरांनी बोलते झाले पाहिजे. देशात कायद्याचे राज्य आहे.

आपण घाबरतो म्हणून घाबरवणारे दहशत करतात. तुमचे नाव गुपीत ठेवले जाईल. तुम्हाला काँग्रेस पूर्ण संरक्षण देईल. मात्र भ्रष्टाचाराला वाचा फोडण्याच्या या जनआंदोलनात नागरिकांनी असेच धाडसी बनत सहभागी व्हावे, असे आवाहन काळे यांनी केले आहे. स्थानिक नगरसेवकांचा भ्रष्टाचार काळे यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले.

ते म्हणाले, हा प्रभाग आमदारांचा आहे. या प्रभागात आमदारांच्या सुविज्ञ पत्नीसह चारही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. या रस्त्यासाठी आमदारांचा वैयक्तिक पुढाकार होता. हे काम नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेले असून यात भ्रष्टाचार झाला आहे.

मनपा आयुक्तांकडे याची काँग्रेस लेखी तक्रार करणार असून बिल अदा करू दिले जाणार नाही. प्रभागातील नागरिकांनी आता यांना जाब विचारायला सुरुवात केली आहे. इथून पुढील काळात प्रभाग १४ मध्ये कामे उत्कृष्ट दर्जाची होतील यासाठी या प्रभागातील काँग्रेस कार्यकर्ते नागरिकांच्या वतीने काम करतील, असे यावेळी काळे यांनी सांगितले आहे.